आकाश कवेत घेताना... (अवकाश निरीक्षणाच्या इतिहासावर ओझरती नजर)
सहज काल रात्री आकाशाकडे लक्ष गेले असता मनात विचार आला... २००९ साली ' आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष ' साजरे केले परंतु अजूनही आपणास या या कधी निळेभोर तर कधी काळ्याकुट्ट कधी लालसर छटा पसरलेल्या तर कधी चमचम करणाऱ्या चांदण्यांनी सुशोभित होणाऱ्या अश्या अवकाशाची नेमकी व अद्ययावत स्वरूपाची माहिती नाही ही खंत मनात वाटली. जॅने टेलर यांनी लिहिलेली, "Twinkle twinkle little star, How I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky" या कवितेच्या ओळी सहज ओठांवर आल्या. खरंच आकाशातील चंद्र चंद्र सूर्य आणि चांदण्यांची विलोभनीय मांडणी आदिम काळापासून मानवाला भूल पाडत आली आहे, असा विचारही मनात आला. मानवाला प्राचीन काळापासून खुणावणाऱ्या आकाशाचे, आकाशातील घटनांची शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षणे करणे कधी सुरू झाले हा प्रश्न मनात आला आणि या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले खरेतर ही निरीक्षणे केव्हा सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही, पण सर्वात प्राचीन वेधशाळा म्हणावी अशी जागा इंग्लंडमध्ये 'सॅलिसबरी' च्या टेकडीवर आहे असे...