संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)

 'संन्याश्यासारखा विचार करा' या पुस्तकाची प्रस्तावना 


तुम्हाला नवीन कल्पना हवी असेल, तर जुने पुस्तक वाचा.

(इव्हान पावलॉव)


मी अठरा वर्षांचा होतो आणि लंडनमधील कास बिझनेस स्कूल या महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी माझ्या एका मित्राने मला त्याच्याबरोबर एका संन्याशाचं व्याख्यान ऐकायला येण्यास सांगितलं. मी विरोध केला. ‘एखाद्या संन्याशाचं व्याख्यान ऐकायला मी का जावं?’ महाविद्यालयाच्या परिसरात मी नेहमीच सीईओंना, प्रसिद्ध व्यक्तींना आणि इतर यशस्वी लोकांना व्याख्याने देताना पाहत होतो; पण मला एखाद्या संन्याशामध्ये बिलकूल स्वारस्य नव्हतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा वक्त्यांचं व्याख्यान ऐकण्यास मी प्राधान्य देत होतो.


 माझ्या मित्राने आग्रहच धरला आणि अखेरीस मी म्हणालो, ‘जर त्यानंतर आपण बारमध्ये जाणार असलो तरच मी येईन.’ ‘प्रेमात पडणं’ हा वाक्प्रचार जवळजवळ नेहमीच अगदी निर्णायकपणे शृंगारिक नातेसंबंधांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो; पण त्या रात्री मी त्या संन्याशाला त्याचे अनुभव सांगताना ऐकलं आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. व्यासपीठावर असलेली ती व्यक्ती साधारणपणे तीस वर्षांची भारतीय व्यक्ती होती. त्याने मुंडन केलं होतं आणि भगवी कफनी घातली होती. तो बुद्धिमान, रसाळ वक्तृत्वशैली असलेला आणि भुरळ पाडणाऱ्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा होता. ‘निःस्वार्थी त्याग’ या तत्त्वाविषयी तो बोलला. ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल, अशी झाडं आपण लावली पाहिजेत, असं त्याने सांगितलं त्या वेळी माझ्या शरीरातून एक अपरिचित शिरशिरी निघून गेल्याचं मला जाणवलं. विशेषतः तो मुंबई आयआयटीचा म्हणजे भारताच्या एमआयटीचा विद्यार्थी होता हे समजल्यावर तर मी जास्तच प्रभावित झालो. एमआयटीप्रमाणेच मुंबई आयआयटीतही प्रवेश मिळणं जवळजवळ अशक्य असतं. मी आणि माझे मित्र ज्या ज्या गोष्टी मिळवण्यासाठी अहमहमिकेने प्रयत्न करत होतो, अशी प्रत्येक गोष्ट मिळवण्याची संधी निव्वळ संन्यासी बनण्याच्या बदल्यात त्याने सोडून दिली होती.


काहीही नसण्यापासून काहीतरी मिळवण्यापर्यंत पोहोचलेल्या लोकांकडे - म्हणजे दरिद्री अवस्थेतून वैभवशाली बनेपर्यंतचा प्रवास केलेल्या लोकांकडे मी संपूर्ण आयुष्यभर आकर्षित होत राहिलो होतो. आता अगदी पहिल्यांदाच मी ज्याने जाणीवपूर्वक याच्या अगदी विरुद्ध गोष्ट केली होती, अशा व्यक्तीच्या सान्निध्यात होतो. आपण सगळ्यांनी ज्या आयुष्याची इच्छा धरली पाहिजे, असं मला जगाने सांगितलं होतं, तसं आयुष्य त्याने सोडून दिलं होतं; पण त्यामुळे एखादी कडवट, अपयशी व्यक्ती बनण्याऐवजी तो एकदम हर्षोल्हासाने भरलेला, आत्मविश्वासू आणि मनःशांती मिळालेल्या अवस्थेत असल्याचं दिसत होतं. खरं तर मी तोपर्यंत ज्या व्यक्तींना भेटलो होतो, त्या सर्वांहून तो जास्त आनंदी दिसत होता. 


अठराव्या वर्षी मी अनेक श्रीमंत लोकांना भेटलो होतो. प्रसिद्ध, सामर्थ्यशाली, दिसायला चांगल्या असलेल्या किंवा या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे लाभलेल्या कित्येक लोकांची व्याख्याने मी ऐकली होती; पण खरोखरच आनंदी असलेल्या कोणाला आपण भेटलो होतो, असं मला वाटत नाही. त्यानंतर तो किती विलक्षण होता आणि त्याच्यामुळे मला किती प्रेरणा मिळाली होती ते सांगण्यासाठी गर्दीतून वाट काढत मी त्याच्यापर्यंत पोहोचलो. “मला तुमच्याबरोबर आणखी जास्त वेळ कसं काय राहता येईल?” मी त्याला विचारलं. मला हव्या असलेल्या गोष्टी असणाऱ्या लोकांसमवेत नव्हे, तर मला हवी असलेली मूल्यं असलेल्या लोकांसमवेत राहण्याची तळमळ माझ्या मनात निर्माण झाल्याचं मला जाणवलं. त्या संन्याशाने मला सांगितलं की, तो संपूर्ण आठवडाभर तो यूकेमधून व्याख्याने देत फिरणार होता आणि त्याच्या उर्वरित कार्यक्रमांना जाण्याची माझी इच्छा असली तर माझं स्वागतच होतं. मग मी तसंच केलं. त्या संन्याशाचं नाव गौरांग दास होतं आणि तो कुठली तरी योग्य गोष्ट करत होता, असं माझं त्याच्याविषयीचं पहिलं मत बनलं होतं. त्यानंतर त्या योग्य गोष्टीमागचं विज्ञान मी शोधून काढू शकेन, असंही मला वाटत होतं.


ध्यान करत असताना संशोधकांना आपल्या मेंदूचं कार्य कसं चालतं ते पाहता यावं, यासाठी नेपाळच्या काठमांडूतून बाहेर पडलेला योंगेय मिंग्युर रिंपोचे नावाचा एक तिबेटी संन्यासी सन २००२मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन इथे गेला होता. शॉवर घेताना केस भिजू नयेत म्हणून वापरल्या जाणाऱ्या टोपीसारख्या साधनाने (ईईजीने) संशोधकांनी त्या संन्याशाचं डोकं झाकलं. त्या साधनातून सेन्सर जोडलेल्या २५०हून अधिक सूक्ष्म तारा बाहेर पडत होत्या आणि त्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाच्या टाळूशी जोडण्यात आल्या होत्या. हा अभ्यास करण्यात आला त्या वेळी त्या संन्याशाने त्याच्या हयातीत बासष्ट हजार तासांचा ध्यानाचा सराव केला होता. नियंत्रक कक्षातून निरीक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांच्या संघात, ध्यानधारणेत तज्ज्ञता प्राप्त केलेल्या काही वैज्ञानिकांचाही समावेश होता. वैज्ञानिकांनी तयार केलेल्या ध्यानाच्या प्रणालीनुसार त्या संन्याशाने ध्यानास सुरुवात केली. त्यात आलटून पालटून एक मिनिट करुणेवर ध्यान करायचं आणि तीस सेकंदं विश्रांती घ्यायची असा नियम होता. रूपांतरकाराने दिलेल्या सूचक इशाऱ्यांनुसार या संरचनेतून त्या संन्याशाने झटपट सलग चार चक्रं पूर्ण केली. संशोधक चकित होऊन निरीक्षण करत होते. कारण, ज्या ज्या वेळी त्या संन्याशाने ध्यान करण्यास सुरुवात केली होती, नेमक्या त्याच क्षणी ईईजीने मेंदूच्या कार्याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याची नोंद केली होती. त्या संन्याशाने त्याची स्थिती बदलल्यामुळे किंवा त्याने केलेल्या हालचालीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने तीव्रता वाढली असावी, असं संशोधकांनी गृहीत धरलं. मात्र त्यांच्या नजरेला तर तो अगदी स्थिर बसल्याचं दिसत होतं.


संन्याशाच्या मेंदूच्या कार्यातील सातत्य म्हणजे ध्यानाची कृती सुरू करणं आणि ती थांबवून विश्रांतीच्या कालावधीत शिरणं या पुनःपुन्हा सुरू आणि बंद करण्याच्या कृतीतील सातत्य ही गोष्टच फक्त लक्षणीय नव्हती, तर या कृतींच्या तयारीसाठी त्याला ‘वॉर्म अप’ कालावधीची गरज भासत नव्हती, ही गोष्टही तितकीच लक्षणीय होती. जर तुम्ही ध्यान करणारी व्यक्ती असाल किंवा किमान तुमच्या मेंदूला शांत करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल की, तुमच्या मनातून सतत संचलन करत राहणारे, लक्ष विचलित करणारे विचार शांत करण्यासाठी थोडा काळ लागतो. खरोखरच एखादं बटण चालू आणि बंद केल्याप्रमाणे तो संन्यासी अगदी सहजगत्या ध्यानाच्या सामर्थ्यशाली अवस्थेत शिरू आणि बाहेर पडू शकत होता, असं दिसत होतं. या सुरुवातीच्या अभ्यासांनंतर सुमारे दहा वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावर त्या एकेचाळीस वर्षांच्या संन्याशाच्या मेंदूचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातून त्याच्या समवयस्क सहकाऱ्यांच्या तुलनेत त्याचा मेंदू वयस्करपणाची कमी लक्षणं दाखवत होता. त्याचा मेंदू त्याच्याहून सुमारे दहा वर्षांहून तरुण असलेल्या व्यक्तीएवढा तरुण होता. 


बौद्ध संन्यासी मॅथ्यू रिकार्ड याच्या मेंदूचंही संशोधकांनी विश्लेषण केलं आणि त्याला ‘जगातील सर्वाधिक आनंदी पुरुष’ असं नामाभिधान देण्यात आलं. कारण, काळजीपूर्वक विचार करणं किंवा लक्ष देणं, स्मृती, अध्ययन आणि आनंदीपणा या संदर्भात विज्ञानाने आतापर्यंत नोंदवलेल्या गॅमा लहरींच्या पातळीहून त्याच्या मेंदूत संशोधकांना गॅमा लहरींची सर्वोच्च पातळी आढळून आली. एखाद्या संन्याशाच्या नोंदी नियमित नोंदींहून भिन्न असणं ही गोष्ट कदाचित नेहमीच्या तुलनेत एक वेगळी असलेली गोष्ट म्हणावी लागेल; पण रिकार्ड हा याबाबतीतील एकमेव व्यक्ती नाही. विविध प्रकारच्या ध्यानांच्या वेळी आपल्या मेंदूंचं विश्लेषण करून घेतलेल्या इतर एकवीस संन्याशांच्या मेंदूंमध्येही ध्यान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ध्यानाच्या वेळी गॅमा लहरींच्या पातळी जोरदारपणे वाढल्याचं आणि तशाच दीर्घकाळ (अगदी झोपेतसुद्धा) टिकून राहिल्याचं आढळून आलं.


आपण संन्याशांप्रमाणे विचार का केला पाहिजे? तुम्हाला बास्केटबॉलच्या मैदानावर कसं वर्चस्व राखावं हे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर तुम्ही बहुधा मायकेल जॉर्डनकडे वळाल. तुम्हाला नावीन्यपूर्ण कल्पना शोधण्याची इच्छा असेल, तर तुम्ही इलॉन मस्कचा तपास कराल, कशा प्रकारे कामगिरी करावी हे शिकायचं असेल तर तुम्ही बेयॉन्सचा अभ्यास कराल; पण तुम्हाला शांतता, शांती आणि उद्दिष्ट यांचा शोध घेण्यासाठी मनाला प्रशिक्षित करण्याची इच्छा असेल तर? मग याबाबतीत संन्यासीच तज्ज्ञ असतात. ब्रदर डेव्हिड स्टिन्डल-रास्ट या बेनेडिक्टिन संन्याशाने सेंटर फॉर स्पिरिच्युअल स्टडीची स्थापना केली. या केंद्रात यहुदी, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम या विविध धर्मांना एकत्र आणलं जातं. रास्टने लिहिलं आहे की, ‘वर्तमानकाळात सातत्याने जिवंत राहण्याचं सजग उद्दिष्ट बाळगणारी सामान्य व्यक्ती म्हणजे संन्यासी होय.’ 


संन्यासी मोहापासून दूर राहतात, टीकाटिप्पणी करण्यापासून स्वतःला परावृत्त करतात, दुःखांशी आणि चिंतांशी दोन हात करतात. अहंभावाचं शमन करतात आणि उद्दिष्टांनी व अर्थांनी काठोकाठ भरलेल्या आयुष्यांची उभारणी करतात. मग पृथ्वीवरच्या अशा सर्वाधिक शांत, आनंदी आणि अत्यंत अर्थपूर्ण लोकांकडून आपण का शिकू नये? संन्याशांसाठी शांत, प्रसन्न आणि निवांत राहणं ही गोष्ट सोपी असते, असा विचार तुम्ही कदाचित करत असाल. जिथे त्यांना कामांशी आणि शृंगारिक जोडीदारांशी जमवून घ्यावं लागत नाही आणि होय, रहदारीच्या तुफान गर्दीच्या वेळांनाही तोंड द्यावं लागत नाही, अशा शांत रचनांच्या, परिस्थितींच्या ठिकाणी दूरवर ते लपून राहतात, त्यामुळे या आधुनिक जगात संन्यासी मला मदत करू शकतो, असा विचार करणं कसं काय शक्य आहे, असा विचारही कदाचित तुम्ही करत असाल.


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संन्यासी हे जन्मतःच संन्यासी नसतात. ते स्वतःचा कायापालट करण्याची निवड केलेले आणि सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेले लोक असतात. ‘जगातील सर्वाधिक आनंदी पुरुष’ असलेला मॅथ्यू रिकार्ड हा पूर्वाश्रमीच्या आयुष्यात जीवशास्त्रज्ञ होता, हेडस्पेस या ध्यानाच्या ॲपचा सहसंस्थापक अँडी पुड्डीकोंबने सर्कशीत प्रशिक्षण घेतलं होतं. आधी वित्तीय क्षेत्रात आणि रॉक बँड्समध्ये असलेले संन्यासीही मला माहिती आहेत. ते तुमच्यासारखेच शाळांमधून, गावांमधून आणि शहरांतून लहानाचे मोठे झालेले असतात. संन्यासी बनण्यासाठी तुम्हाला घरात मेणबत्त्या पेटवण्याची, अनवाणी फिरण्याची किंवा पर्वतशिखरांवर वृक्षासन करत उभे असल्याची तुमची छायाचित्रं पोस्ट करण्याची गरज नसते. संन्यासी बनणं ही एक प्रकारची मनोवस्था आहे आणि ती कोणीही स्वीकारू शकतो.


आजच्या बहुतांश संन्याशांप्रमाणेच मीही एखाद्या आश्रमात वाढलो नाही. माझं बहुतांश बालपण मी संन्याशांशी कसलंच साधर्म्य नसलेल्या गोष्टी करण्यात घालवलं. चौदाव्या वर्षापर्यंत मी एक आज्ञाधारक मूल होतो. लंडनच्या उत्तरेकडच्या भागात माझ्या पालकांसमवेत आणि माझ्या लहान बहिणीसमवेत मी मोठा झालो. मी एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबातील आहे. अनेक पालकांप्रमाणे माझे पालकही शिक्षणाशी आणि मला तातडीने चांगल्या भवितव्याकडे नेण्याशी बांधील होते. मी संकटांपासून दूर राहिलो, शाळेत चांगला अभ्यास केला आणि प्रत्येकाला आनंदी बनवण्यासाठी शक्य तितके उत्तम प्रयत्न केले.


पण माध्यमिक शालेय शिक्षण सुरू झाल्यानंतर या सगळ्याला कलाटणी मिळाली. आधी मी भरपूर वजन असलेला एक लठ्ठ मुलगा होतो आणि त्यामुळे माझा नेहमीच उपहास, छळ केला जात होता; पण आता मात्र माझं वजन मी कमी केलं आणि सॉकर व रग्बी खेळायला सुरुवात केली. पारंपरिक भारतीय पालक सहसा ज्या विषयांना अनुकूल नसतात, ते कला, डिझाईन आणि तत्त्वज्ञान या विषयांकडे मी वळलो. हे सारं काही सुरळीतपणे सुरू राहिलं असतं; पण त्याच वेळी मी चुकीच्या टोळक्यांमध्ये मिसळण्यास सुरुवात केली. वाईट मुलांच्या संगतीत मी राहू लागलो. मादक पदार्थ चाखून पाहू लागलो. मारामाऱ्या करू लागलो. खूप प्रमाणात दारू पिऊ लागलो. माझं सारं काही सुरळीतपणे सुरू नव्हतं. हायस्कूलमध्ये मला तीन वेळा निलंबित करण्यात आलं. अखेरीस मला शाळा सोडण्यास सांगण्यात आलं.


‘मी स्वतःला बदलेन,’ असं मी वचन दिलं, ‘तुम्ही मला शाळेत राहू दिलं तर मी माझ्यात बदल घडवून आणेन.’ शाळेने मला ठेवून घेतलं आणि मी जबाबदारीने वागण्यास सुरुवात केली. अखेरीस, महाविद्यालयात गेल्यावर कठोर परिश्रम, त्याग, शिस्त आणि आपल्या उद्दिष्टपूर्ततेच्या प्रयत्नांमधील सातत्य या गोष्टींचं मूल्य माझ्या लक्षात येऊ लागलं. यातली समस्या अशी होती की, त्या वेळी चांगली नोकरी मिळवणं, एखाद्या दिवशी लग्न करणं, आपलं कुटुंब तयार करणं यांसारख्या नेहमीच्या गोष्टींखेरीज माझ्यासमोर दुसरं कुठलंही उद्दिष्ट नव्हतं. याहून काहीतरी अधिक सखोल असलं पाहिजे असा संशय मला येत होता; पण ते काय होतं ते मला माहिती नव्हतं.


माझ्या महाविद्यालयात गौरांग दास व्याख्यान देण्यासाठी येईपर्यंत मी नवनवीन कल्पनांचा धांडोळा घेणं, जगण्याचा नवीन नमुना शोधणं आणि (माझ्यासकट) प्रत्येकालाच मी जो मार्ग चोखाळावा, असं वाटत होतं, त्याहून वेगळ्या मार्गाचा शोध घेणं हीच मला सर्वांत महत्त्वाची गोष्ट वाटत होती. मला विनयशीलता करुणा आणि समरसता या गोष्टींना केवळ सैद्धान्तिक संकल्पना म्हणून समजून घ्यायचं नव्हतं, तर मला त्या गोष्टी जगायच्या होत्या. शिस्त, चारित्र्य आणि सचोटी, प्रामाणिकपणा या गोष्टी फक्त मी वाचलेल्या गोष्टी म्हणून तेवढ्यापुरत्याच मर्यादित राहाव्यात, असं मला वाटत नव्हतं. मला त्या जगायच्या होत्या.


त्यानंतरची पुढची चार वर्षं मी दोन जगांमध्ये हातचलाखी करत फिरत राहिलो. बारमध्ये आणि मांसाहारी पदार्थांच्या खानावळींमध्ये जाण्यापासून ते ध्यान करणं आणि जमिनीवर झोपणं इथपर्यंतच्या दोन जगांत मी वावरत होतो. लंडनमध्ये वर्तनशास्त्र विषयावर भर देऊन मी व्यवस्थापन विषयाचा अभ्यास केला आणि एका मोठ्या सल्ला संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांसोबत वेळ घालवला. माझ्या ख्रिसमसच्या आणि उन्हाळी सुट्ट्यांपैकी बहुतेक सुट्ट्या मी मुंबईतील आश्रमात संन्याशांच्या सान्निध्यात राहण्यात, प्राचीन ग्रंथांच्या वाचनात आणि अभ्यासात घालवल्या. हळूहळू माझ्या मूल्यांमध्ये बदल घडून आला. मला संन्याशांच्या आसपास राहण्याची इच्छा असल्याचं माझ्या लक्षात आलं. खरं तर संन्याशाच्या मनोरचनेत स्वतःला बुडवून टाकण्याची माझी इच्छा होती. औद्योगिक जगात मी करत असलेलं काम मला अधिकाधिक निरर्थक असल्यासारखं वाटू लागलं. जर त्याचा कोणावरही सकारात्मक परिणाम होत नसेल तर त्यात काय अर्थ होता? 


महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर मी सुटाऐवजी कफनी घातली आणि जिथे आम्ही जमिनीवर झोपत होतो आणि जिमच्या लॉकर्सहून बाहेरच्या जगात जगत होतो त्या आश्रमात प्रवेश केला. मी भारतात राहिलो आणि भारतात, यूकेमध्ये व युरोपमध्ये सर्वत्र प्रवास केला. रोज मी तासन्तास ध्यान केलं आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला. मुंबईच्या बाह्य भागातील एका खेड्यात असलेल्या आश्रमाचं पर्यावरणस्नेही आध्यात्मिक एकांतवासाच्या सुरक्षित ठिकाणात (गोवर्धन इकोव्हिलेज) रूपांतर करण्याच्या सुरू असलेल्या कामात साहाय्य करण्याची आणि माझ्या सहकारी संन्याशांबरोबर सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर रोज सुमारे दहा लाखांहून अधिक जणांना अन्नदान करण्याच्या (अन्नामृत) कार्यक्रमातही मला सहभागी होता आलं. जर एखाद्या संन्याशासारखा विचार करण्यास मी शिकू शकतो, तर कोणीही तसा विचार करू शकतो. 


मी ज्या हिंदू संन्याशांकडून शिकलो ते त्यांचे पायाभूत ग्रंथ म्हणून वेदांचा वापर करत होते (ज्ञान असा अर्थ असलेल्या वेद या संस्कृत शब्दापासून या ग्रंथांना हे शीर्षक देण्यात आलं आहे. संस्कृत ही प्राचीन भाषा असून दक्षिण आशियात आज बोलल्या जाणाऱ्या बहुतांश भाषांची ही अग्रभाषा आहे). सध्या पाकिस्तानात असलेले काही भाग आणि वायव्य भारत या परिसरातून किमान तीन हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या ग्रंथांच्या प्राचीन संग्रहातून हिंदू धर्माचा पाया असलेल्या तत्त्वज्ञानाचा प्रारंभ झाला, असा युक्तिवाद तुम्ही करू शकाल. होमरच्या अविस्मरणीय महाकाव्याप्रमाणेच वेदही पहिल्यांदा मौखिक पद्धतीनेच संक्रमित करण्यात येत होते. त्यानंतर अंतिमतः ते लिखित स्वरूपात तयार करण्यात आले; पण ते ज्यावर लिहिले गेले होते (भुर्जपत्रं आणि ताडपत्रं) त्या साहित्याच्या नाजूकपणामुळे सध्या आपल्याकडे टिकून राहिलेला बहुतेक दस्तऐवज हा काही शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. वेदांमध्ये स्तोत्रांचा, ऐतिहासिक कथांचा, कवितांचा, प्रार्थनांचा, मंत्रांचा, समारंभांच्या-सोहळ्यांच्या विधींचा आणि दैनंदिन आयुष्यासाठीच्या सल्ल्यांचा समावेश आहे.


माझ्या आयुष्यात मी सतत गीतेचा संदर्भ घेतो आणि या पुस्तकातही मी वरचेवर भगवत् गीतेचा (परमेश्वराचं गीत असा त्याचा अर्थ आहे) संदर्भ दिला आहे. ख्रि.पू. सुमारे ८०० ते ४०० वर्षं लिहिल्या गेलेल्या उपनिषदांवर ती ढोबळमानाने आधारित आहे. भगवत् गीता ही जीवनविषयक वैश्विक आणि कालातीत माहितीपुस्तिका मानली जाते. यातील कथा ही संन्याशांविषयीची नाही किंवा आध्यात्मिक संदर्भातही ती आलेली नाही. एका बुद्धिमान धनुर्धारी असलेल्या विवाहित पुरुषाला ती सांगितली गेली आहे. ती फक्त एकाच धर्माला किंवा प्रदेशाला लागू केली जावी असा तिचा उद्देश नव्हता - ती संपूर्ण मानवजातीसाठी आहे. एकनाथ ईश्वरन् या आध्यात्मिक लेखकाने आणि प्राध्यापकाने भारताच्या अनेक पवित्र ग्रंथांचं भाषांतर केलं आहे. त्यामध्ये भगवत् गीतेचाही समावेश आहे, त्यांनी भगवत् गीतेला ‘भारताने जगाला दिलेली सर्वाधिक मौल्यवान भेट’ म्हटलं आहे.


आपल्या १८४५च्या नियतकालिकात राल्फ वाल्डो इमर्सनने असं लिहिलं होतं की, ‘माझ्या मित्राचा मी ऋणी आहे - आणि भगवत् गीतेच्या (होय, गीतेच्याच) त्या भव्यदिव्य दिवसाचाही मी ऋणी आहे. जणू काही एखादी साम्राज्यसत्ताच आपल्याशी बोलत असावी असं ते होतं, भगवत् गीतेतील कोणतीही गोष्ट लहान किंवा बिन महत्त्वाची नव्हती, तर ती भव्यदिव्य, पवित्र, सातत्यपूर्ण होती. दुसऱ्या एका युगात आणि वातावरणात चिंतन करण्यात आलेल्या पुरातन ज्ञानाचा तो आवाज होता आणि आपल्याला आजही पडणाऱ्या त्याच प्रश्नांना तिने निकाली काढलं होतं. सर्व पुस्तकांमधील अशा प्रकारचं ते पहिलंच पुस्तक होतं.’ इतर कोणत्याही ग्रंथाच्या तुलनेत गीतेविषयी अधिक प्रमाणात भाष्यं करण्यात आली आहेत, असं म्हटलं जातं. संन्यासी म्हणून मला देण्यात आलेल्या शिक्षणाचा पाया असलेल्या इतर प्राचीन शिकवणुकींसह या ग्रंथातील कालातीत विद्वत्तेशी जोडलं जाण्यास तुम्हाला मदत करणं हा हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा एक हेतू आहे. आज आपण सर्वच जण ज्या आव्हानांना तोंड देत आहोत, त्यांच्याशी या ग्रंथांमधील विद्वत्ता लक्षणीयपणे समर्पक, सुसंबद्ध आहे.


मी संन्याशांचं तत्त्वज्ञान वाचलं, त्या वेळी गेल्या तीन हजार वर्षांत माणूस खरोखरच बदललेला नाही ही गोष्ट माझ्या मनाला सर्वाधिक भिडली. आपण नक्कीच अधिक उन्नत झालो आहोत आणि आपलं सरासरी आयुर्मानही वाढलं आहे; पण संन्याशाच्या शिकवणुकीत क्षमाशीलता, ऊर्जा, हेतू, उद्देशाधिष्ठित जगणं आणि अशाच प्रकारच्या आजच्या काळातही निनादत असलेल्या इतर मुद्द्यांवर भाष्य असतं हे बघून मी आश्चर्यचकित आणि प्रभावितही झालो. हे ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले, त्या काळातही या गोष्टी नक्कीच अशाच निनादत, दुमदुमत राहिलेल्या असल्या पाहिजेत. याहूनही अधिक प्रभावी गोष्ट म्हणजे या पुस्तकात सर्वत्र आपण पाहू, त्याप्रमाणे संन्याशांच्या विद्वत्तेला विज्ञानाकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ देणं शक्य आहे. कित्येक सहस्रकांपासून संन्याशांचा असा विश्वास आहे की ध्यान आणि विचारपूर्वकता या गोष्टी लाभदायक असतात, कृतज्ञता ही गोष्टच तुमच्या दृष्टीने चांगली असते, सेवा तुम्हाला अधिक आनंदी बनवते आणि अशाच इतर आणखी काही गोष्टीही तुम्ही या पुस्तकातून शिकाल. आधुनिक विज्ञानाला या कल्पना दाखवून देणं किंवा त्यांना वैध ठरवणं शक्य होण्याच्या कित्येक वर्षं आधीच त्यांनी या कल्पनांभोवती काही प्रघात, रीती विकसित केल्या. आइन्स्टाईनने असं म्हटलं होतं, ‘तुम्हाला सहजपणे एखादी गोष्ट स्पष्ट करता येत नसेल, तर तुम्हाला ती योग्य प्रकारे पुरेशा प्रमाणात समजलेली नाही.’ मी शिकत असलेले धडे आधुनिक जगाशी किती समर्पक आहेत, हे मला दिसलं त्या वेळी इतरांनाही मला ते सांगता यावेत, यासाठी मला त्यांच्यामध्ये आणखी सखोल बुडी मारण्याची इच्छा झाली.


मी मुंबईत आल्यानंतर तीन वर्षांनी माझे गुरू गौरांग दास यांनी मला असं सांगितलं की, मी आश्रम सोडून देऊन, मी जे काही शिकलो होतो, ते जगाला सांगितलं तर त्यामुळे मी जास्त मोलाचा आणि सेवाभावी ठरेन, असा त्यांचा विश्वास होता. संन्यासी म्हणून मी व्यतीत केलेली तीन वर्षं ही जीवनाच्या शाळेसारखी होती. संन्यासी होणं ही गोष्ट कठीण होती आणि आश्रम सोडून जाणं ही त्याहूनही कठीण गोष्ट होती; पण आश्रमाच्या बाहेरच्या भागात जीवनाची विद्वत्ता वापरणं हा कर्मकठीण भाग होता - मला ते अंतिम परीक्षेसारखं वाटत होतं. रोजच माझ्या असं लक्षात येत होतं की, संन्याशाची मनोरचना काम करते - ती प्राचीन विद्वत्ता अगदी धक्कादायकपणे, आश्चर्यकारकपणे आजही समर्पक आहे म्हणूनच मी ती सांगत आहे.


मी विवाहित आहे आणि संन्याशांना लग्न करण्याची परवानगी नसते म्हणून मी स्वतःचा संदर्भ ‘माजी संन्यासी’ असा देत असलो तरी या काळात अजूनही मी स्वतःला संन्याशीच समजतो. मी लॉस एंजेलिसमध्ये राहतो. लोक मला असं सांगतात की, लॉस एंजेलिस हे भौतिकतावादी, वरकरणी देखावा करणाऱ्या, फसव्या, कल्पनाजाल विणणाऱ्या आणि सर्वसामान्यपणे धोकेबाज, अविश्वसनीय असलेल्या जागतिक राजधान्यांपैकी एक शहर आहे; पण आधीच अज्ञान दूर झालेल्या, संस्कारसंपन्न ठिकाणी मुळातच का राहावं? आता जगात आणि या पुस्तकात मी जगलेल्या आयुष्यातून मी घेतलेल्या गोष्टींविषयी आणि मी जे शिकलो आहे, त्याविषयी मी सांगणार आहे. हे पुस्तक पूर्णपणे अ-सांप्रदायिक आहे. ही कोणत्याही प्रकारची धर्मांतर करण्याची चोरटी व्यूहरचना नाही, हे मी शपथपूर्वक सांगतो! मी सादर करत असलेल्या साहित्याशी तुम्ही जोडले गेलात आणि तुम्ही त्याचा सराव केलात तर तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ, उत्कटता आणि हेतू तुम्हाला शोधता येईल. 


याआधी कधीही लोक इतके असमाधानी नव्हते किंवा ‘आनंद’ मिळवण्यासाठी इतका निष्फळ खटाटोप करण्यात एवढे व्यग्र झालेले नव्हते. आपल्यासमोर कर्तबगार आणि यश मिळवलेल्या लोकांचे नमुने ठेवून आपली संस्कृती आणि प्रसारमाध्यमं आपल्या मनात आपण कोण आणि काय असावं याविषयीची प्रतिमा आणि संकल्पना भरवतात. प्रसिद्धी, पैसा, भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आणि अत्यंत आकर्षक सौंदर्य, लैंगिकता यांपैकी कोणतीही गोष्ट अखेरीस आपलं समाधान करू शकत नाहीत. आपण फक्त या मंडलातील गोष्टी अधिकाधिक प्रमाणात शोधू लागतो आणि त्या आपल्याला नैराश्य, भ्रमनिरास, असमाधान, नाखुशी आणि शीण किंवा थकवा यांच्याकडे घेऊन जातात.


मला संन्यस्त मनोरचना आणि सहसा नेहमीच जिचा संदर्भ माकडाची मनोरचना असा दिला जातो, ती मनोरचना यांच्यातील विरोधाभास दाखवून देण्याची इच्छा आहे. आपलं मन एक तर आपली उन्नती घडवून आणतं किंवा आपली अधोगती करतं. आज आपण सगळेच जण अतिविचार, दिरंगाई आणि चिंता यांच्याशी संघर्ष करत आहोत आणि परिणामी, माकडाच्या मनाचे लाड पुरवत आहोत. माकडाचं मन हे निरुद्देशपणे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर आणि कुठलंही आव्हान खरोखरच न सोडवता फक्त एका आव्हानावरून दुसऱ्या आव्हानावर टुणटुण उड्या मारत राहतं; पण आपल्याला काय हवं आहे याचा मुळापर्यंत सखोल शोध घेऊन आणि वाढीसाठी कृती करण्याजोग्या पायऱ्या निर्माण करून आपण स्वतःला संन्याशाच्या मनोरचनेपर्यंत उन्नत बनवतो. संन्याशाची मनोरचना आपल्याला संभ्रमातून, गोंधळातून आणि विचलितपणातून वर उचलते आणि स्पष्टता, अर्थपूर्णता आणि दिशा शोधण्यास मदत करते. 


<<सामान्य माणसाचे मन आणि संन्याशाचे मन यातील फरक>>

सामान्य माणसाचे मन आणि संन्याशाचे मन यातील फरक
सामान्य माणसाचे मन आणि संन्याशाचे मन यातील फरक


‘संन्याशासारखा विचार करणं’ ही गोष्ट आयुष्याकडे पाहण्याचा आणि आयुष्यापर्यंत पोहोचण्याचा आणखी एक मार्ग विचारार्थ पुढे ठेवते. बंडखोरी, अलिप्तता, पुनर्शोध, हेतू, लक्ष एकवटणं, शिस्त आणि सेवा यांचा हा मार्ग असतो. अहंभाव, असूया, लालसा, चिंता, क्रोध, कडवटपणा, ओझं यांपासून आयुष्याला मुक्त करणं हे संन्याशाच्या विचारसरणीचं उद्दिष्ट असतं. माझ्या मते, संन्याशाची मनोरचना स्वीकारणं फक्त शक्यच नाही, तर ते आवश्यकही आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपण अविचलपणा, नीरवता, शांतता यांचा शोध घेण्याची गरज असते.


संन्याशांच्या शाळेतील माझा पहिला दिवस मला अगदी लख्ख आठवतो, मी नुकतंच मुंडन केलं होतं; पण तोपर्यंत मी कफनी घालत नव्हतो आणि तेव्हाही लंडनवरून आल्यासारखाच दिसत होतो. माझं लक्ष एका लहान वयाच्या संन्याशाकडे गेलं - त्याचं वय नक्कीच दहाहून जास्त नसावं, तो पाच वर्षांच्या मुलांच्या गटाला शिकवत होता. तो अतिशय प्रभावशाली होता. त्याच्याकडे प्रौढांसारखं आत्मसंयमन आणि आत्मविश्वास होता. 

‘तू काय करतोयस?’ मी विचारलं. 

‘आम्ही नुकताच त्यांना पहिला धडा शिकवून संपवला,’ तो म्हणाला आणि नंतर त्याने मला विचारलं, ‘शाळेत पहिल्या दिवशी तुम्ही काय शिकला होतात?’ 

‘मी अक्षरं आणि आकडे शिकण्यास सुरुवात केली होती. ते काय शिकले?’ 

‘श्वसन कसं करावं ही गोष्ट आम्ही त्यांना पहिल्यांदा शिकवतो.’ ‘का?’ मी विचारलं. ‘कारण तुमच्या जन्मापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत तुमचा श्वास, तुमचं श्वसन हीच गोष्ट कायम असते. तुमचे सगळे मित्र, तुमचं कुटुंब, तुम्ही राहत असलेला तुमचा देश या सगळ्या गोष्टी बदलू शकतात; पण तुमच्यासोबत जी गोष्ट कायम राहते ते तुमचं श्वसन असतं.’ 


त्या दहा वर्षांच्या साधूने पुढे सांगितलं, ‘तुम्ही तणावात असता, त्या वेळी कशात बदल होतो? तुमच्या श्वसनात. तुम्ही संतप्त होता, त्या वेळी कशात बदल होतो? तुमच्या श्वसनात. श्वसनातील बदलासमवेतच आपण प्रत्येक भावनेचा अनुभव घेतो. ज्या वेळी तुम्ही आपल्या श्वसनावर नियंत्रण मिळवू शकता, त्याला दिशा देऊ शकता आणि त्याचं व्यवस्थापन करण्यास शिकता, त्या वेळी तुम्ही आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता, तिला दिशा देऊ शकता.’ या संभाषणाच्या आधीपासूनच मला वृक्षाच्या पानावर किंवा समस्येच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं जात नव्हतं, तर गोष्टींच्या मुळावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं जात होतं आणि एखादी व्यक्ती फक्त पाच किंवा दहा वर्षांचीच असली तरी कोणीही संन्यासी बनू शकतो ही गोष्ट मी थेट निरीक्षणाच्या माध्यमातून शिकत होतो.


जन्म झाल्याबरोबर आपल्याला जी पहिली गोष्ट करावीच लागते ती असते श्वसन; पण जसजसं त्या नवजात अर्भकाच्या दृष्टीने आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं बनत जातं तसतसं निश्चल अवस्थेत बसून श्वसन करणं अतिशय आव्हानात्मक बनू शकतं. या पुस्तकातून तुम्हाला संन्याशाचा मार्ग दाखवला जाईल, अशी मला आशा आहे - आपण गोष्टींच्या मुळाशी जातो, आत्मपरीक्षणात सखोल शिरतो. या जिज्ञासेतून, चौकसपणातून, विचारांतून, परिश्रमातून आपण हे करत जातो आणि आपल्याला शांतता, नीरवता आणि हेतू सापडत असल्याची जाणीव होते. आश्रमातील माझ्या शिक्षकांनी दिलेल्या या विद्वत्तेचा वापर करून मी तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करेन, अशी मला आशा आहे.


पुढच्या पानांतून मी तुम्हाला संन्याशाची मनोरचना स्वीकारण्याच्या तीन टप्प्यांमधून नेणार आहे. पहिला टप्पा हा आपल्याला मागे खेचणाऱ्या बाह्य प्रभावांपासून, अंतर्गत अडथळ्यांपासून आणि भीतींपासून आपली सुटका करून घेणं म्हणजेच त्या गोष्टी सोडून देणं हा असतो. याला आपण ‘सोडून द्या’ किंवा ‘जाऊ द्या’ असं म्हणतो. वाढीसाठी जागा मिळवण्याकरिता करावयाची साफसफाई म्हणून आपण याचा विचार करू शकतो. ‘आपण वाढू किंवा वाढत राहा,’ हा दुसरा टप्पा असतो. तुम्हाला हेतू, उद्दिष्ट आणि आत्मविश्वास यांच्यासह निर्णय घेणं शक्य व्हावं, यासाठी तुमच्या आयुष्याची पुन्हा नव्याने जडणघडण करण्यास मी तुम्हाला मदत करेन. अखेरीस, आपल्या पलीकडचं जग पाहून, आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यापक बनवून आणि ती इतरांशी वाटून घेऊन, तसंच आपले नातेसंबंध अधिक सखोल, दृढ बनवून ‘आपण देऊन टाकू किंवा देऊन टाका’ हा टप्पा येतो. आपल्याला लाभलेल्या देणग्या आणि प्रेम आपण इतरांशी वाटून घेतो आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा शोध लागतो. सेवेमुळे होणाऱ्या लाभांनी आपण आश्चर्यचकित होतो.


या मार्गावर मी तुम्हाला ध्यानाचे तीन अतिशय वेगळे प्रकार सांगणार आहे. तुमच्या सरावात तुम्ही त्यांचा समावेश करावा, अशी मी शिफारस करतो. श्वसनकार्य, कल्पनाचित्र आणि ध्वनी हे ते तीन प्रकार आहेत. या सर्वांचे लाभ आहेत; परंतु त्यांच्यात फरक करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिक लाभांसाठी - शांततेसाठी, निःस्तब्धतेसाठी आणि समतोलासाठी श्वसनाचे स्वाध्याय पार पाडता, मानसशास्त्रीय लाभांसाठी - भूतकाळातील जखमा भरून काढून भविष्याची तयारी करण्यासाठी कल्पनाचित्रं रेखाटता आणि परामानसी किंवा आत्मिक लाभांसाठी - आपल्या अत्यंत सखोल असलेल्या स्वत्वाशी आणि विश्वाशी जोडले जाण्यासाठी, खरोखरच्या शुद्धीकरणासाठी मंत्रपठण करता.


या पुस्तकातून लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ध्यान केलंच पाहिजे असं नाही; पण तुम्हाला जर लाभ मिळवायचे असतील तर त्यासाठी मी दिलेली साधने अधिक तेजाळ, धारदार आहेत. हे संपूर्ण पुस्तक म्हणजेच एक ध्यानधारणा आहे, असं मी म्हणू शकेन. हे पुस्तक म्हणजे आपल्या विश्वासांवर, श्रद्धांवर, मूल्यांवर आणि हेतूंवर विचार करणं आहे. आपण स्वतःकडे कसं पाहतो, आपण कसे निर्णय घेतो, आपल्या मनांना कसं प्रशिक्षित करतो आणि लोकांची निवड करण्याचे आणि त्यांच्याशी आंतरक्रिया करण्याचे आपले मार्ग कसे व कोणते आहेत, या सर्वांवर विचार करणं म्हणजे हे पुस्तक आहे, असं सांगण्यापर्यंतही मी पुढे जाऊ शकेन. अशा प्रकारची सखोल आत्मजागृती प्राप्त करणं हा ध्यानाचा हेतू आहे आणि तेच ध्यानामुळे मिळणारं बक्षीसही आहे. एखाद्या संन्याशाने याविषयी कसा विचार करावा? हा प्रश्न अगदी आताच तुम्ही स्वतःला विचारण्याची गरज नसावी - बहुधा सध्या हा प्रश्न तुम्हाला फारसा जवळचाही वाटत नसावा - पण या पुस्तकाच्या अखेरीपर्यंत तुम्ही तो विचारू शकाल. 


(अमेझॉनवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे